Saturday 12 October 2013

सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य

‘सध्याच्या काळात विध्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यातून शिक्षक जर साधना करणारा असेल, तर त्याला हे सहज शक्य होते. मात्र काळानुरूप ही शिक्षणव्यवस्था भारतीय संस्कृतीतून नष्ट होत गेली. सध्याची शिक्षणपद्धत ही पाश्चात्यांच्या विचारांवर आधारलेली आहे. हे लक्षात घेऊन ‘सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य’ यात होत गेलेले पालट एका शिक्षिकेने लिहिलेल्या लेखाद्वारे पुढे देत आहे.

आश्रमातील सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी आणि आचार्य या दोघांनाही होणे 
        पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात होती. त्यामध्ये विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तरदायित्वही आचार्यांवर होते. विद्यार्थी गुरुगृही राहून शिक्षण घेत असत. ‘आचार्य देवो भव’ अशीच प्रतिमा विध्यार्थ्यांच्या मनात सिद्ध होत होती. त्यामुळे आचार्य हे स्वतः साधना करणारे असल्याने विध्यार्थ्यांवरही तसेच संस्कार होत असत. त्याशिवाय आश्रमातील सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी आणि आचार्य या दोघांनाही होत असे.

शालेय पद्धतीत होत गेलेले पालट
शाळेत मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना असणे : प्रारंभीच्या काळातशाळेत शिकवणार्‍या शिक्षकांच्या साध्या रहाणीमानाचा आणि विचारांचा आदर्श विध्यार्थ्यांसमोर होता. त्यांचे सात्त्विक आचार, विचार विध्यार्थ्यांना अनुकरण करण्यास योग्य होते. त्यामुळे शाळेत गेल्यावर आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना होती.
‘संस्कार, धर्माचरण’ हे शब्दच समाजामधून लोप पावत चालल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन हाणे : जसजसा शिक्षणामध्ये पाश्चात्यांचा प्रभाव पडत गेला, तसतसा शाळेतील शिक्षकांमध्येही पालट होत गेला. पुढच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या. त्यामुळे शिक्षकांना ‘सर, मॅडम’ म्हणवून घेण्यातच धन्यता वाटू लागली. त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांमध्येही अशाच प्रकारचे संस्कार होतांना दिसत आहेत. ‘संस्कार, धर्माचरण’ हे शब्दच समाजामधून लोप पावत चालल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन होतांना दिसते.

इतर धर्मीय विध्यार्थ्यांची शालेय स्थिती 
        इतर धर्मीय विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्थाही केली जाते. मात्र हिंदु समाजाला अशा प्रकारचे धर्मशिक्षण दिले जात नाही.

सामाजिक स्थिती 
        या धावपळीच्या युगात अशी संस्कारक्षम पिढी निर्माण न होण्याची अनेक करणे आहेत. आई-वडिलांना चाकरीमुळे मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. विभक्त कुटूंबपद्धतीमुळे घरात संस्कार करणारे आजी-आजोबाच नाहीत. त्यामुळे मुले लहान असतील, तर पाळणाघरात ठेवली जातात किंवा घरात बसून दूरदर्शनवरील कार्यक्रम बघण्यात ती आपला वेळ घालवतात. यामध्ये त्यांना चांगले-वाईट सांगणारे कोणीही नसते.

राजकीय परिस्थिती 
        पूर्वीच्या काळी राजेसुद्धा धर्माचरणी असल्याने ते ऋषीमुनींच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करत; पण सध्याचे राज्यकर्ते हे धर्माचरणी नसल्याने हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यास सक्षम नाहीत. शिक्षण संस्था या राज्यकत्र्यांच्याच मालकीच्या असल्याने त्यातून संस्कारक्षम विद्यार्थी तर सोडाच, चांगले परीक्षार्थी घडण्याची अपेक्षाही आपण करू शकत नाही.

सध्याची शिक्षण पद्धती 
        प्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे. त्याला शिकण्यातील आनंद मिळण्यापेक्षा कटकटीच जास्त भेडसावू लागल्या आहेत. त्याही पुढे आता पाठ्यपुस्तकातून वास्तवताच लोप पावत चालली आहे. त्यामुळे त्यांतून विध्यार्थ्यांवर संस्कार होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत जर हिंदु संस्कृती टिकवायची असेल, तर शिक्षकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते. भावी काळात शिक्षक जर साधक झाला, तर समाजाला संस्कारक्षम शिक्षण तोच देऊ शकतो. मग शिक्षकाने साधक व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे ?
दैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधून त्यावर उपाय सांगणे, म्हणजेच साधना शिकवणे : अभ्यासक्रमाचे तात्त्विक अंग शिकवून विध्यार्थ्यांना आनंद मिळू शकत नाही. त्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिकरण करावे. दैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधून त्यावर उपाय सांगणे, म्हणजेच साधना शिकवणे.
धर्माचरण आणि साधना : स्वतः नियमित धर्माचरण आणि साधना करून विध्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावा. विध्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने साधना समजावून सांगण्याइतपत पुरेसे ज्ञान शिक्षकाला असले पाहिजे.
अभ्यासू वृत्ती : सतत सत्य जाणून घेण्याची इच्छा आणि त्यासाठी अभ्यासू वृत्ती बाळगणे
कृती : संस्कार करण्यासाठी केवळ उपदेश न करता कृतीतून शिकवणे

संस्कार आणि धर्माचरण शिकवण्यासाठी काही उपक्रम
अ. वर्गाच्या ग्रंथालयात संस्कार करणार्‍या आणि धर्मशिक्षण देणार्‍या पुस्तकांचा समावेश करणे
आ. शाळेच्या प्रशासकीय वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत संस्कारवर्गांचे आयोजन करणे
इ. पालकसभांचे औचित्य साधून पालकांशी विध्यार्थ्यांच्या प्रगतीसह संस्कार, धर्माचरण, तसेच साधना या विषयांवर चर्चा करणे
ई. शाळेतील बालसभांमधून (जयंती, पुण्यतीथी, इतर विशेष दिवस) धर्माचरणी व्यक्ती, संत, साधक यांचे मार्गदर्शन विध्यार्थ्यांना मिळण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करणे
उ. आपल्या सहकारी शिक्षकांना साधना सांगणे आणि दैनंदिन उपक्रमात त्यांचे सहकार्य घेणे
ऊ. कार्यानुभव सारख्या विषयांत देवालयांची स्वच्छता, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे, यांसारखे उपक्रम घेणे
        एवढ्या गोष्टी जर शिक्षकाने केल्यास विद्यार्थी आणि समाज सुसंस्कारीत होऊ शकतो. यातून शिक्षकाची समष्टी साधना होऊन ऋषीऋण आणि समाजऋण फेडले जाऊन तो ईश्वरी कृपेस पात्र ठरेल.’
-

No comments:

Post a Comment