Saturday 24 August 2013



     ९९९ चा विश्वचषक सुरु व्हायला दोन-तीनच दिवस बाकी होते.आम्ही तेंव्हा देवळाली कॅम्प च्या सैनिकी वसाहतीत राहायचो.आई-बाबांचा आणि क्रिकेट चा तर दूरदूरवरचा संबंध नव्हता,लहान भाऊ खुपच लहान असल्याने त्याच्या आवडीचा प्रश्नच येत नव्हता,मलाही क्रिकेट मध्ये फार रस नव्हता,पाहायला तर मुळीच आवडत नसे पण कधी-कधी गल्लीत मित्रांबरोबर खेळायचो ते हि काहीच करायला नसेल तरच!. थोडक्यात आमच्या घरात कुणालाही क्रिकेटविषयी थोडीही आपुलकी नव्हती.त्याच कालावधीत माझा आवडता आते-भाऊ जो एक क्रिकेट-प्रेमीही आहे त्याच्या १०वी च्या परीक्षा उरकून काही दिवस आमच्याकडे राहायला आला होता.माझे सर्वात लहान काका रेल्वेमध्ये नौकरी करतात त्यांची बदली त्यावेळेला ‘मनमाड’ ला होती,त्यांनाही विश्वचषकाच्या ज्वराने झपाटले होते,त्याचा आनंद लुटता यावा म्हणून त्यांनी मनमाड-देवळाली कॅम्प ‘अप-डाऊन’ करायचे ठरवले.मग काय,काका त्यांची रात्री-बेरात्रीची नौकरी करून यायचे आणि त्यावेळेस फक्त सात-आठ वाहिन्याच दिसायच्या मग हे दोघे ‘मामा-भांजे’ मी सकाळी उठायच्या अगोदरपासूनच ‘टीव्हीचा’ ‘रिमोट’ घेऊन बसायचे आणि जणू काही सामन्यापुर्वीचा सराव करताय असे क्रिकेटविषयी जे काही मिळेल ते पाहत बसायचे.मला मात्र त्यांचे ते आवडायचे नाही कारण आमच्याकडे टीव्ही काही महिन्यांपूर्वीच आला होता,सकाळी उठल्या-उठल्या मला ‘कार्टून्स’ पाहायची सवय लागली होती ते त्यांच्यामुळे बघायला मिळत नसे.लहानपणापासूनच काकांची भीती वाटत असल्याने त्यांच्याकडे कधीच ‘रिमोट’ मागायची हिम्मत झाली नाही.पण कधी-कधी काका नसले कि मी त्या दादाला म्हणायचो ‘मी तुम्हाला फक्त ‘इंडियाचीच’ म्याच बघू देईल बर का!’ आणि तो मला लगेच काकांचा धाक घालायचा,त्यामुळे तो माझा आवडता भाऊ काही दिवसांतच नावडता झाला होता.मग काय थोडावेळ बाहेर काहीतरी खेळून यायचे आणि घरात कुठेतरी एका कोपऱ्यात त्यांच्या गप्पा ऐकत बसायचे कारण क्रिकेट कळायचे नाही.
     मी बाहेर माझ्या मित्रांमध्ये खेळायला जायचो तेंव्हा ते पण क्रिकेटविषयीच बोलायचे,खासकरून अधून-मधून ‘अरे इंडिया के पास सचिन है  यार’,’लेकिन सचिन आउट हो जाने के बाद इंडिया हार जाती है’,’यार काश इंडिया-पाकिस्तान कि टीम मिलजाये तो हमे कोईभी नही हारा पायेगा’,असे ‘डायलॉग’ मारायचे.त्यामुळे मला त्यांच्या संभाषणात सहभागी होता यायचे नाही कारण क्रिकेट बद्दल खुपच कमी माहिती असल्यामुळे शब्द कमी पडायचे.मग मी हि ठरवले कि आपणहि क्रिकेट पाहूया,श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात १४ मे ला विश्वचषकाचा पहिला सामना पाहण्यासाठी मामा-भांजे आणि कधी भारताचाच सामना न पाहिलेला मी तो सामना पाहण्यासाठी सज्ज झालो.एखाद्या फलंदाजाने चौकार मारला किंवा एखादा बाद झाला कि ते मामा-भांजे लगेच टाळ्या पिटायचे,त्यांनी पिटली कि मग,मी हि पिटायचो!.दादाला विचारले ‘कोण जिंकेल?’,तो म्हटला ‘श्रीलंका’.थोडावेळ बसलो आणि खूप कंटाळा आला कधी झोपलो मलाच कळले नाही.सकाळी उठलो आणि दादाला विचारले ‘श्रीलंका जिंकली ना काल?’

दादा-“नाही,इंग्लंड जिंकली”,

मी-“अरे पण तू बोलला होता ना,कि श्रीलंका जिंकेल म्हणून’

दादा-“अरे ते दोन्हीहि संघ चांगले होते,मला वाटत होते कि श्रीलंका जिंकेल म्हणून...,पण नाही जिंकली,इंग्लंड ची टीम चांगली खेळली,कालचे सोड रे!, आज बघ! ,भारताचा सामना आहे आज ‘दक्षिण आफ्रिकेबरोबर’,सचिन बघ कसा मारेल एकेकाला”.

     मला प्रश्न पडायचा,क्रिकेट म्हटले कि सचिनचेच नाव का येते? चौथीच्या वर्गातही बाईंनी ‘माझा आवडता खेळ-क्रिकेट’ निबंध लिहून देताना सचिनचाच उल्लेख केला होता.’क्रिकेट फिवर’ असल्याने बाहेर मित्रपण सचिनचेच गुणगान गात असतात आणि दादापण सचिनकडूनच अपेक्षा ठेऊन बसला आहे.त्याचे नाव तर मी खूपवेळा ऐकले होते पण त्याला टीव्हीवर खेळतांना कधीच पहिले नव्हते तेंव्हा ठरवले नेमके सचिन मैदानावर अशी काय जादू करतो? ते आज पाहुयाच.
     दुपारचे जेवण करून आम्ही सगळे टीव्हीसमोर बसलो.प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सचिन-गांगुली फलंदाजी करण्यासाठी आले.मी दादाला विचारले “खरच सचिन खूप ‘सिक्स’ मारतो का रे?” तो म्हटला ‘तू फक्त बघ!,कळेल तुला’. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर गांगुलीने एक खणखणीत असा फटका मारला आणि टीव्हीवरील प्रेक्षकांबरोबरच मामा-भांजे यांनीही गोंगाट केला.दुसऱ्या षटकात सचिन खेळायला आला,माझे आख्खे लक्ष त्याच्याकडे होते.गोलंदाजाने चेडू फेकला आणि सचिनने तो सोडून दिला.मी लगेच दादाकडे पाहिले आणि मी काही म्हणायच्या आतच तो म्हणाला ‘मारेल,मारेल...थांब!,पहिलाच बॉल होता’.त्याच्यापुढचा चेंडू मात्र सचिनने मारला पण एकहि धाव मिळाली नाही.पुढच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र सचिनने एक सुरेख फटका मारला आणि चौकार गेला आणि टीव्हीवर बोलणारा माणूस जोरजोराने ओरडायला लागला,आणि त्या आवाजात मामा-भांजे,माझी आणि शेजाऱ्यापाजार्यांच्या गोंगाटाची भर पडली.त्याच षटकात सचिनने अजून एक चौकार मारला.मला जास्त काही कळत नव्हते पण ज्या तऱ्हेने ते दोघे फटके मारत होते ते पाहून फार आनंद होत होता.जसजसा सामना पुढे सरकत होता तसतसे ते धावांचा पाऊस पाडतच होते पण त्यातच १५ व्या षटकात सचिन बाद झाला आणि तो टीव्हीवरील माणूस सोडून आम्ही सगळेच शोकात विलीन झालो.पुढे सौरव गांगुलीने काही प्रमाणात खिंड लढवण्याचा प्रयत्न केला पण दक्षिण आफ्रिकेचा संघ त्या सामन्यात सरस ठरला.
     तो विश्वचषक संपेपर्यंत तर मला आख्खे क्रिकेट कळायला लागले होते (निदान मला तरी तसे वाटत होते),त्या विश्वचषकामुळेच मी या खेळाच्या प्रेमात पडलो आणि आता तो माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे.आजही सचिन जेंव्हा फलंदाजीला येतो मी त्याच उत्साहाने टीव्हीसमोर बसतो आणि त्या जादुगाराच्या जादूत हरवून जातो.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वयोमानानुसार काही शारीरिक मर्यादा येतात तशा त्याच्या खेळातहि मर्यादा आल्या आहेतच! तरीही तो त्याच्या पूर्ण शक्तीनिशी या करोडो चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून तर त्याच्याविषयीचा आदर अजूनच वाढतो.


No comments:

Post a Comment