Tuesday 27 August 2013

व्यक्तिमत्त्व विकास

आपल्या अनुवंशिकतेने आणि आजूबाजूच्या वातावरणाने, अनुभवाने आपली जी जडणघडण होते ते म्हणजे व्यक्तिमत्व. पण बहुतांश वेळा आपल्या जडणघडणीचा आणि आलेल्या अनुभवांचा व्यक्तिमत्व साकार होण्यास जास्त हातभार असतो.
प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या वेगळेपणातच त्याची मजा आहे. प्रत्येक व्यक्तीमत्वात त्याच्या उणीवा आणि बलस्थाने पण असतात कारण कोणीही एक व्यक्ती म्हणून परिपूर्ण नाही. असे असले तरी आपण व्यक्तिमत्व विकास केंद्रांच्या मदतीने परीपूर्णतेकडे वाटचाल नक्कीच करू शकतो.
व्यक्तिमत्व विकास ह्या विविध पातळ्यांवर साधला जातो.                        
१ शारीरिक पातळी – देहबोली 
२ मानसिक पातळी- ताण तणाव सहन करण्याची क्षमता
३ सामाजिक पातळी- सामाजिक समस्या समजून त्या सोडवण्याची क्षमता.
व्यक्तिमत्व विकास केंद्रात आपल्या उणीवांवर काम करण्याची संधी मिळते. उदा. काही व्यक्तींना स्टेजवर उभे राहून बोलण्याची भीती वाटते.अशावेळी व्यक्तिमत्व विकास केंद्रात ह्याबाबत प्रयत्न केले जातात.
शारीरिक पातळी - काही क्षेत्रात पेहरावही त्यांच्या नोकरीचा महत्वाचा भाग असतो.  बहुतांश वेळा कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत हे काळात नाही अशावेळी कोणत्या प्रकारचा पेहराव कधी घालावा ह्या संबंधी सुद्धा व्यक्तिमत्व विकास केंद्रात मदत मिळते
मानसिक पातळी – स्वताच्या विचारांवर आपला व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतो. त्यामुळे सकारात्मक विचार , स्वताला आपल्यात असलेल्या गुण दोषांसकट स्वीकारणे महत्वाचे ठरते.
सामाजिक पातळी – काही जणांचे काम हे लोकांसोबतच असते. उदा. एखादा समाजसेवक. आणि कधी कधी एखाद्या समस्येला समजून घेण्यात त्यांना अडचणी येतात अशावेळी सामाजिक पातळीवरच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज असते.
अशाप्रकारच्या विविध गोष्टींवर व्यक्तिमत्व विकास केंद्रात मदत मिळते. व्यक्तिमत्व विकास खाजगी कंपन्यांमध्ये उपयोगी पडणारी कौशल्ये सुद्धा शिकवली जातात .
व्यक्तिमत्व विकास केंद्राचा  मनीषाला झालेला फायदा पाहूया.
मनीषा एका स्वयंसेवी संस्थेत नुकतीच कामाला रुजू झाली होती. त्यामुळे तिला तिथे जरा एकट वाटायच. ती कुणाशी फार बोलायची नाही कुणात फार मिसळायची नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या कामावर परिणाम होऊ लागला. अशावेळी तिने व्यक्तिमत्व विकास केंद्रात जायचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर तिला तिच्या स्वताच्या मानसिकतेवर परत विचार करता आला. कामाच्या ठिकाणच्या समस्यांच निरसन करता आल. त्यानंतर ती स्वताहून सर्वांमध्ये मिसळू लागली आणि तिच्या कामाचा दर्जाही सुधारला.
अशा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्तिमत्व विकास केंद्रांची मदत होते. 
व्यक्तिमत्त्व विकासाचे फार विकृत पैलू सध्या दिसायला लागलेत. समोरच्या माणसावर आपली छाप पडणं, कोणत्याही प्रश्नाला न बिचकता चटपटीत उत्तर देता येणं, अस्खलित (?) इंग्लिश बोलता येणं, कुठेही बुजायला न होणं, कोणत्याही मर्यादा (inhibitions) नसणं म्हणजे चांगलं व्यक्तिमत्त्व अशी समजूत होते आहे. स्वतःकडे पाहायचं ते इतरांच्याच डोळ्यांनी! त्यांना आपण कसे दिसतो ते महत्त्वाचं. आपलं आपण कधी आपल्या आत डोकावून पाहायचंच नाही. हे कुठलं शिक्षण आहे? का हा दिखाऊपणा, उथळपणा मुलांच्या माथी मारायचा?
विकासाच्या नावाखाली आपण मुलांना ‘‘असामान्य’’ करायच्या मागे आहोत. ही आपली लाडकी मुलं, देशाचे भावी आधारस्तंभ, ही विकसित व्यक्तिमत्त्वं मोठी होऊन नेमकं काय करणार आहेत?
डॉक्टर होऊन सामान्य माणसाच्या खिशातला पैसा उपसून बंगले उभारणार आहेत? बिल्डर होऊन सामान्य माणसाला रडवणार आहेत? वकील-न्यायाधीश होऊन सामान्य माणसाची फरपट करणार आहेत? राजकारणी होऊनही सामान्य माणसाच्या नरडीवर पाय देणार आहेत? अभ्यासक, संशोधक होऊन परदेशात स्थायिक होऊन स्वतःच्याच माय मातीवर थुंकणार आहेत?
ज्या मुलांना शाळेत बुटाला पॉलिश नसलं तर शिक्षा होते; स्वच्छ इस्त्रीचे कपडे नसले तर दंड होतो, ती मुलं जेव्हा पायात न घालणार्या - अनवाणी धूळ भरल्या पायांना भेटतील, अंगावरच्या फाटक्या चिरगुटांना पाहतील तेव्हा त्यांना त्या मागची माणसं दिसणार आहेत?
आपण कोणते डोळे त्या मुलांना देतो आहोत? कसलं मन देतो आहोत? चैन-उपभोग-मौज-स्वार्थ यांनी भरलेलं बालपण त्यांना मिळालं तर ती चांगली माणसं होणार तरी कशी?
आणि ही आपापल्या पोटची पोरं वरवर जावीत अशा महत्त्वाकांक्षा बाळगणारी पालकांची आतडी ज्यांना पालकच नाहीत अशा मुलांसाठी कधी तुटणारच नाहीत का? आपल्या मुलासाठी शंभर रुपये पाकिटातून निघतात तेव्हा त्यातले पाच दहा इतर गरीब मुलांसाठी खर्च करायची बुद्धी पालकांना कधी होणारच नाही का? आणि ही जाणीव पालकांना नसली तर ती मुलांमधे येणार कुठून?
ज्या देशाशी, ज्या इतिहासाशी, ज्या थोर माणसांशी आपली नाळ जोडलेली आहे त्यांच्यातलं काय सत्त्व आज आपल्या जगण्यात उरलंय? गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगातला एक तरी आपल्या वागण्यात डोकावतो? आगरकर फुल्यांचे आपण वारस कोणत्या समाज सुधारणेचा ध्यास घेतो? कृष्णमूर्तींना महान मानणारे आपण आपल्या रोजच्या जीवनात कोणती साधना करतो?
व्यक्तिमत्त्वविकासाच्या दिखाऊ, पाश्चात्य, शहरी, निरुपयोगी फॅडांपासून पालकांनी दूर राहायला हवं. ही पैशांनी विकत घेता येणारी गोष्ट नाही. त्यासाठी आतूनच मूल विकसित व्हायला हवं. त्याला त्याच्या त्या त्या वयातल्या जबाबदार्यांची जाणीव हवी. देशातल्या गरिबांचा मनापासून कळवळा हवा. काही थेरं नाकारण्याची ताकद हवी. त्यासाठी स्वतंत्र विचार हवा, विशाल मन हवं.
असा विकास घडायचा तर पालकांना आणि शिक्षकांना, राजकारण्यांना आणि समाजधुरीणांना सर्वांनाच आपण काय करतो आहोत, कसे वागत आहोत याचं भान हवं. मुलं शिबिरातून शिकतात त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्या माणसांकडून नकळत शिकतात. तेव्हा व्यक्तिमत्त्वविकास हा शब्द पोरांच्या पाठीमागे लावून देण्याआधी स्वतःच्या मनात पेरण्याची जबाबदारी मोठ्या माणसांची आहे.

No comments:

Post a Comment