Monday 9 September 2013

              मी राजकारणी नाही, खेळाडू आहे – सचिन तेंडुलकर


पुणे, दि. 1 (प्रतिनिधी) - राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी माझ्या नावाची केलेली शिफारस हा माझा सन्मान आहे. परंतु मी खासदारकी स्वीकारली याचा अर्थ मी राजकारणात प्रवेश केलेला नाही. मी राजकारणी नाही, तर खेळाडू आहे आणि अखेरपर्यंत खेळाडूच राहणार, असा स्ट्रेट ड्राइव्ह विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आज लगावला.
सचिन तेंडुलकरच्या राज्यसभेवरील नियुक्तीवरून सध्या उलटसुलट वादविवाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर सचिनने आज प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. शतकांचे महाशतक ठोकल्याबद्दल पुण्यातील एका बिल्डरच्या वतीने सचिन आज जाहीर सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्रकट मुलाखतीत तो बोलत होता. शतकांची सेन्चुरी हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा क्षण नव्हता. तर भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणे हे माझे स्वप्न होते. गेल्यावर्षी ज्यावेळी भारताने वर्ल्ड कप जिंकला, तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता, असेही सचिनने यावेळी स्पष्ट केले.
राज्यसभेची खासदारकी हा माझ्यासाठी बाऊन्सर होता. खरे तर तो मोठा सन्मान आहे. लतादीदी, पृथ्वीराज कपूर यांच्यासारख्या दिग्गजांप्रमाणे राष्ट्रपतींनी माझ्या नावाची शिफारस राज्यसभा खासदारकीसाठी करावी, हा माझा गौरव आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ही संधी दिली जाते, तेव्हा तो तुमचा सन्मान असतो. त्यामुळे राज्यसभा खासदारकी मिळाल्यानंतर मला आनंद झाला. परंतु मी काही राजकारणी नाही. मी खेळाडू आहे आणि क्रिकेट हेच माझे विश्व आहे. मी क्रिकेट अजिबात सोडणार नाही. अगदी जसे शक्य आहे, तसे मी क्रिकेटसाठी योगदान देत राहीन, अशी पुस्तीही सचिनने यावेळी जोडली.
याआधी मला वायुदलाने ग्रूप कॅप्टन हा बहुमान दिला होता. पण मी अद्यापही एकदाही विमान उडवलेले नाही. तसेच मला मिळालेली खासदारकी म्हणजे काय ? हे मी नीट जाणतो. त्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव असून ती पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही सचिनने सांगितले. सचिन म्हणाला की, जगण्याच्या पत्येक टप्प्यावर नवनवीन आव्हाने असतात. त्यामुळे तुम्ही सदैव तणावाखाली असता. अशा तणावात काम करणे हेच कौशल्य असून मला विश्वास आहे की, अशा परिस्थितीतही माणूस १० पैकी ८ गूण मिळवू शकतो. मी तरुण पिढीला एवढेच सांगेन की, त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे. मी नववीपासून क्रिकेट खेळू लागल्याने शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. पण शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे.

No comments:

Post a Comment